- *रस्ता रोको चक्काजाम आंदोलनाची कार्यकारी अभियंता यांनी घेतली दाखल* *जानाळा–पोंभूर्णा रस्त्याच्या निकृष्ट कामाची ठेकेदाराची अधिकाऱ्यांसमोर पोलखोल*
मूल -जानाळा–पोंभूर्णा मार्गावरील सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकामाच्या निकृष्ट दर्जाविरोधात मूल तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनाची अखेर कार्यकारी अभियंता वंजारी मॅडम यांनी दखल घेतली. आंदोलनानंतर दिलेल्या लेखी आश्वासनानुसार महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांनी गुरुवारला झालेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीत जानाळा, टोलवाही,सुशी येथील सरपंच व रस्त्यालगतचे नागरिक यांनी सुद्धा कार्यकारी अभियंता वंजारी मॅडम समोर आपली अडचण समजाऊन समजाऊन सांगितले असता रस्ता व नाली बांधकामातील अनेक गंभीर त्रुटी, केलेले निकृष्ट काम उघडकीस आल्याने आंदोलनकर्त्यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे स्पष्ट झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
९ जून रोजी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली नागरिक, शेतकरी व युवकांनी जानाळा येथे चक्काजाम आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंत्यांच्या प्रत्यक्ष पाहणीनंतरच पुढील काम सुरू करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले होते. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र गुरुवारी झालेल्या पाहणीत बांधकामातील अनेक गंभीर त्रुटी समोर आल्याने प्रशासनाच्या देखरेखीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पाहणीदरम्यान महिनाभरापूर्वी तयार करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ्या भेगा पडल्याचे दिसून आले. तसेच नव्याने बांधलेल्या नाल्यांनाही तडे गेल्याचे आढळले. रस्त्याच्या पायाभूत कामात आवश्यक मुरुमाऐवजी मातीचा वापर करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला. काही ठिकाणी जुन्या डांबरी रस्त्याचे खोदकाम न करता त्यावरच सिमेंट काँक्रीटचा थर टाकण्यात आल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे भविष्यात रस्त्याचे आयुष्य कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
याशिवाय अनेक ठिकाणी रस्ता व नाल्यांची उंची वाढल्याने नागरिकांच्या घरांचा स्तर खालच्या बाजूला गेला आहे. त्यामुळे पावसाळ्यात नाल्यांचे पाणी घरांमध्ये शिरण्याची शक्यता निर्माण झाली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. पाहणीदरम्यान संतप्त नागरिकांनी कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालत विविध समस्या मांडल्या.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात संबंधित विभागातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्याचा आरोप नागरिक व आंदोलनकर्त्यांनी केला आहे. काम सुरू असताना गुणवत्तेची तपासणी, मोजमाप व नियमित देखरेख झाली असती तर ही परिस्थिती उद्भवली नसती, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. कोट्यवधी रुपयांच्या विकासकामात निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.
जोपर्यंत झालेले निकृष्ट बांधकाम तोडून नव्याने दर्जेदार काम केले जात नाही, तोपर्यंत पुढील काम सुरू करू देणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. त्यामुळे प्रशासन आणि कंत्राटदारांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले असून चक्काजाम आंदोलनामुळेच या कामातील गंभीर त्रुटी समोर आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. आता प्रशासन दोषींवर कारवाई करून निकृष्ट कामाची पुनर्बांधणी करते की नाही, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. *ठेकेदाराचे प्रतिनिधी जतिन मिश्रा यांना कार्यकारी अभियंत्याने सर्वांसमोरच चोप दिला*. *आंदोलन कर्त्यांच्या मागणीनुसार कार्यकारी अभियंता वंजारी मॅडम यांनी नाली व रस्त्याची पाहणी केली तेंव्हाच जतिन मिश्रा यांना सर्वांसमोर झापले व आजच तात्काळ कॉन्ट्रॅक्टरला शोकाज नोटीस द्यावे,असे सर्वांसमोर सोबत असलेल्या प्रशासन अधिकाऱ्यास तोंडी आदेश दिले*





