Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedअवैध्य रेतीची तस्करी करणाऱ्यांवर महसूल प्रशासनाची मोठी कारवाई. तीन हायवा जप्त. ...

अवैध्य रेतीची तस्करी करणाऱ्यांवर महसूल प्रशासनाची मोठी कारवाई. तीन हायवा जप्त. रेती तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले.

*अवैध्य रेती वाहतूक करणाऱ्यांवर महसूल प्रशासनाची मोठी कारवाई तीन हायवा जप्त*
*रेती तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले*

मूल – मूल तालुक्यात अवैध रेती उत्खनन व वाहतुकीला पुन्हा जोर चढला असून मूल येथील महसूल प्रशासनाने रेती तस्करांविरोधात मोठी कारवाई करत तीन हायवा ट्रक पकडल्याने खळबळ उडाली आहे. जुनगाव घाटावरून अवैधरित्या रेती उत्खनन करून चंद्रपूरकडे वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती महसूल प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून जुनासुर्ला- नवेगाव रोडवर ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईदरम्यान हायवा ट्रक क्रमांक एमएच 34 बीजी 9067, एमएच 34 बीजी 6399 व एमएच 34 बीझेड 3639 या तीन वाहनांना ताब्यात घेण्यात आले. पकडण्यात आलेली वाहने तहसील कार्यालय परिसरात जमा करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे. महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
विशेष म्हणजे, १० जून २०२६ पासून नियमित रेती घाट बंद करण्यात आले असतानाही तालुक्यातील विविध नदीपात्रातून सर्रासपणे रेती उपसा सुरू असल्याचे चित्र आहे. रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक होत असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याची चर्चा आहे. अनेक ठिकाणी नियमांना हरताळ फासत नदीपात्रातून जेसीबी, पोकल्यांड यंत्राच्या सहाय्याने रेती उपसा केला जात असल्याची माहिती पुढे येत आहे.
अवैध रेती उत्खननामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून नदीपात्राचे नुकसान होत आहे. तसेच शासनाच्या महसुलालाही मोठा फटका बसत असल्याने महसूल प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतली आहे. रेती तस्करांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथके सक्रिय करण्यात आली असून संशयित वाहनांवर नजर ठेवली जात आहे.
महसूल प्रशासनाने अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे रेती तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून तालुक्यातील अवैध रेती उत्खननाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. *– रात्रीच्या वेळेला अवैध्य रेतीची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहितीच्या आधारावर जुनासुरला – नवेगाव रस्त्यावर महसूल प्रशासनाची टीमने तीन हायवा जप्त करण्यात आले. सापडलेल्या अवैध्य रेती भरलेल्या हायवा ट्रकचा पंचनामा करुन पुढील कारवाई सुरु आहे. – *मृदुला मोरे तहसीलदार मूल*

मुख्य संपादक

श्री. गुरु गुरनुले
मुख्य संपादक
94228396769422839676
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Popular News