*वन्यप्राण्यांच्या दहशतीत शेतकरी किती दिवस जगणार?* *चंदु पाटील मारकवार ( स्वच्छता दूत)*. *राजगड येथे बिबट्याने मारल्या ५ बकऱ्या* मूल – संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श ग्राम म्हणून परिचित असलेल्या मूल तालुक्यातील मौजा राजगड येथे दिनांक ,१२ सुटेंबर २०२६ रोजी रात्री २ वाजता वनपरिक्षेत्र सावली रेंज मध्ये येणाऱ्या राजगड येथील गरीब शेतकरी गंगाधर चौधरी यांच्या घरच्या ३ बकऱ्या ठार केल्या. एवढ्यावरच बिबट्याचा समाधान न झाल्याने परत दुसऱ्या ठिकाणी जाऊन देवा भोयर या गरीब शेतकऱ्याच्या २ बकऱ्या ठार केल्याची घटना काल घडल्याने राजगड व परिसरातील गावात वाघ बिबट्याच्या दहशतीने राजगड येथील नागरिक भयभीत झाले आहेत. तीन दिवसापूर्वी मूल पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या हळदी गावात ११ तारखेला रात्रीच्या सुमारास बिबट्याने मोरेश्वर बुरांडे यांच्या घराच्या परिसरात घुसून अनेक कोंबड्या फस्त केल्याने हळदी गावातही चांगलीचं दहशत माजली असून राजगड व हळदी गावात वन्यप्राण्यांच्या रात्रीच्या दहशतीने दोन्ही गावातील नागरिकांची तसेच परिसरातील गावातील जनतेची पूर्ण झोप उडाली आहे. मूल तालुक्यात सतत होत असलेल्या वन्यप्राण्यांच्या दहशतीमुळे दोन्ही गावातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून शासनाचा वनविभाग व त्यांचे बंगल्यात झोपणारे वन अधिकारी मूल तालुक्यातील शेतकऱ्यांना व नागरिकांना किती दिवस वन्यप्राण्यांच्या दहशतीतीच जगणार? असा प्रश्न आदर्श ग्राम राजगडाचे माजी सरपंच, व स्वच्छता दूत मान.चंदु पाटील मारकवार यांनी केला असून गरीब शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई तात्काळ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी द्यावी,अशी मागणी चंदु पाटील यांनी केली आहे.




