*रेल्वे मालधक्का निर्मितीचा विषय अनभिज्ञ.प्रशासनाकडे प्रस्ताव किंवा अधिकृत पत्र नाही* *उपविभागीय अधिकारी अजय चरडे यांची स्पष्टोक्ती*
मूल – मूल शहरात गेल्या महिना भरापासून प्रस्तावित रेल्वे मालधक्का नक्कीच होणार? तर दुसरी बाजू मूल येथील मालधक्का रद्द झालाच पाहिजे अशा गंभीर विषयावर सोशल मीडियावर, प्रिंट मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती. मालधक्का मूल येथे होऊ नये, यासाठी मालधक्का संघर्ष समितीने क्षेत्राचे आमदार तसेच प्रशासनाला निवेदने देत विरोधाची भूमिका घेतली होती.तर दुसरीकडे मात्र काही स्थानिक राजकीय नेत्यांकडून मालधक्का व्हायलाच हवा, अशी भूमिका मांडण्यात आल्याने शहरातील वातावरण चांगलेच तापले होते. त्यामुळे मूल नगरातील नागरिकांमध्ये मालधक्का नेमका होणार की नाही, याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी मंगळवार दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी आपल्या शिष्टमंडळासह मूलचे उपविभागीय अधिकारी अजय चरडे यांची प्रत्यक्ष भेट घेतली. रेल्वे मालधक्का संदर्भात प्रशासकीय स्तरावर शासकीय पत्र प्राप्त झाले आहे का, कोणती प्रक्रिया सुरू आहे का, याची त्यांनी विचारणा केली असता त्यावर उपविभागीय अधिकारी अजय चरडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, सद्यस्थितीत केंद्र किंवा राज्य शासनाकडून अशा कोणत्याही प्रस्तावाची प्रशासकीय प्रक्रिया सुरू नाही आणि भूसंपादनाबाबत आतापर्यंत शासनाकडून महसूल विभागाला काहीही निर्देश प्राप्त नाही.किंवा संबंधित रेल्वे विभागाकडून कोणतेही अधिकृत पत्र कार्यालयात प्राप्त झालेले नाही. तसेच मालधक्का संदर्भातील चर्चा केवळ वर्तमानपत्रांतील बातम्या व प्रशासनाला आलेल्या निवेदनावरून आणि सोशल मीडिया वरुन मला कळले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. व याबाबत जनतेनी शांतता बाळगावी अशी विनंती सुद्धा केली. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मालधक्का प्रकरणामुळे शहरातील जनतेमध्ये निर्माण झालेला संभ्रम, अफवा आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. आता प्रशासनाच्या स्पष्ट भूमिकेमुळे सत्य परिस्थिती समोर आली आहे. या प्रसंगी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस संतोषसिंह रावत यांचे समवेत कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तथा नगर परिषद उपाध्यक्ष राकेश रत्नावार, जिल्हा महासचिव व आदर्श सह.खरेदी विक्री सोसायटीचे अध्यक्ष घनश्याम येनुरकर, मूल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गुरु गुरनुले, शहर अध्यक्ष सुनील शेरकी, न. प. सभापती विलास कागदेलवार, नगर सेवक बंडू गुरनुले, रूमदेव पाटील गोहणे, संजय पडोळे, धनराज रामटेके आदी उपस्थित होते.




