*तेंडुपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या चार महिलांवर वाघाचा हल्ला चारही महिला ठार*
*सिंदेवाही गुंजेवाही जंगलातील घटना परिसरातील गावात दहशतीचे वातावरण*. *(मजुरवर्ग जगतील कसे,त्यांच्या कुटुंबाचे काय, चारही महिलेच्या कुटुंबातील मुला मुलींना शासनाने नोकरी द्यावी)*
मूल – दरवर्षी प्रमाणे यंदाही पत्तासिजन सुरु झाले असून ग्रामीण मजुरांना यामध्ये चांगली मजूरी मिळते. कुटुंबाच्या उदर निर्वाहासाठी मजूर वर्गाला धावपळ करावीच लागते. परंतु तेही कधी कधी नियतीच्या वेळेला मान्य होत नाही. यातच वाघाने मजूर महिलांवर हल्ला करून चारही महिलांना ठार केल्याने कुटुंब आईमुळे पोरके झाल्याची घटना घडल्याने सर्वत्र दहशत पसरली आहे. मृतांमध्ये कवडूबाई दादाजी मोहुर्ले (४५), अनुबाई दादाजी मोहुर्ले (४६), संगीता संतोष चौधरी (३६) आणि सुनीता कौशिक मोहुर्ले (३३) यांचा समावेश आहे. या सर्व महिला गुंजेवाही व परिसरातील रहिवासी असून रोजच्या प्रमाणे तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेल्या होत्या.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सकाळच्या सुमारास या महिला जंगलात कामात व्यस्त असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घातली. हल्ला इतका वेगवान आणि तीव्र होता की महिलांना बचावाची कोणतीही संधी मिळाली नाही. या भीषण हल्ल्यात चारही महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वनविभाग व पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी हलविण्यात आले असून परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. संबंधित वाघाचा शोध काढण्यासाठी वनविभागाने विशेष पथक तैनात केले आहे.
या घटनेमुळे गुंजेवाहीसह आसपासच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तेंदूपत्ता हंगाम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर मजूर जंगलात जात असतात. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करत वनविभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून गरज नसल्यास जंगलात जाणे टाळावे, असेही सांगितले आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी गेलेल्या महिलांना वाघाने ठार केल्याने त्या चारही कुटुंबाचा आधारच नाहीसा झाका असून मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत व आधार देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.तरी देखील शासनाने त्यांच्या कुटुंबातील मुला मुलींना नौकरी देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्थानी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच तेंदुपत्ता ठेकेदारांनीही त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी अशीही मागणी केली आहे.
या घटनेमुळे मानव-वन्यजीव संघर्षाचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.




